भारतीय जैन संघटना, आरित फाऊंडेशन आणि बजाज उद्योगसमूह यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेली लासुर येथील अत्याधुनिक चारा छावणी दुष्काळग्रस्त शेतकर्यांसाठी आधार बनली आहे. तब्बल ३० एकरच्या विस्तृत परिसरात असलेल्या या छावणीत तब्बल सहा हजार जनावरांच्या निवार्राची व चारापाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गंगापूर, वैजापूर, खुलताबाद आणि कन्नड तालुक्यातील शेतकर्यांनी जनावरे या छावणीत आणली आहेत . ही चारा छावणी उभारण्यासाठी दोन महिन्यापासुन नियोजन सुरू होते. जागेची पाहणी करण्यापासून ते आराखडा तयार करण्यापर्यंत आम्हाला येथील स्थानिक नागरिक व आ. प्रशांत बंब यांनी खूप मदत केल्याचे मनोगत शांतीलाल मुथा यांनी लासूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, उपविभागीय अधिकारी डॉ. सानप, बजाज ऑटोचे सल्लागार सी. पी. त्रिपाठी, जानकीदेवी बजाज, ग्रामविकास संस्थेचे कार्यकारी अधिकारी डॉ. अरुण जोशी, कार्यकारी संचालक सुधीर पांडे, छावणी प्रमुख गौतम संचेती, जिल्हाध्यक्ष किशोर ललवाणी, प्रवीण पारख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
चारा छावणीचे ठळक वैशिष्ट्ये
- तब्बल ३० एकर परिसरात ६००० जनावरांच्या निवार्याची अतिशय उत्तम सोय.
- १०० CCTV कॅमेरे
- जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा
- पाण्यासाठी २५ हौद
- प्रत्येक जनवराला दररोज १५ किलो चारा
- प्रत्येक जनावरांचा विमा
- छावणीचे स्वतंत्र मोबाईल अॅप
- जनावरासोबत रहायला आलेल्या शेतकर्यांला फक्त १० रुपयात पोटभर जेवण
- शेतकर्यांच्या करमणूकीसाठी रोज सांस्कृतिक कार्यक्रम
या आणि यांसारख्या अनेक गोष्टीतील अतिशय सूक्ष्म नियोजन हे या चाराछावणीचे वेगळेपण आहे.